Soybean Rate : सोयाबीनचा भाव किती झाला ? पाहा येथे सविस्तर माहिती.

आंतरराष्ट्रीय बाजारात आत्ता सोयाबीनचे दर हे (Soybean Rate) काहीसे नरमले होते. सोयातेलाच्या दरातील तेजीही आज थांबली पाहायला मिळत होती. मात्र देशात प्रक्रिया प्लांट्सची (Soybean Processing Plant) खरेदी वाढल्यानं दरातील वाढ ही कायम होती आणि असं असूनही शेतकऱ्यांची बाजारातील सोयाबीनची आवक वाढली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन बाजारात कालपासून काहीशी स्थिरता आलेली आहे. सोयाबीन आणि सोयातेलाचे दर काहीसे कमी झालेले असून सोयापेंडचे दर हे किंचित सुधारले दिसत आहेत. अमेरिकेतील सोयाबीनची काढणी आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेली आहे. तर ब्राझील आणि अर्जेंटीना या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक देशांना सलग तिसऱ्या वर्षीला फटका बसतोय.

ब्राझीलमधील माटो ग्रासोसह महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये कमी पावासामुळे पेरणीला अडथळा निर्माण झालाय. तर अर्जेंटीनातही काही भागात पेरणीसाठी पोषक स्थिती झालेली नाही. याचा परिणाम सोयाबीनची पेरणी आणि उताऱ्यावर देखील होऊ शकतो, असा अंदाज ही काहीजण व्यक्त करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात जवळपास अर्ध्या टक्क्याची घट दिसत आहे. सोयाबीनचे वायदे हे १४.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले आहेत. तर सोयातेलाचे व्यवहार ७५.८८ सेंट प्रतिपाऊंडने झालेले आहेत. सोयाबीन आणि सोयातेलाचे वायदे कालपासून काहीसे स्थिर दिसत आहेत तर शुक्रवारपर्यंत दोन्ही मालाच्या किमती सातत्याने वाढतच होत्या असे पाहायला मिळत होते. मात्र सोमवारपासून दरात चढ-उतार सुरु झालेले आहेत. असं असलं तरी आज सोयापेंडच्या दरात किंचित सुधारणा झालेली अपल्याला पाहायला मिळत होती. सोयापेंडचे वायदे हे ४१९.५४ डाॅलर प्रतिटनाने असे पार पडले.

देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या दरात 50 ते 100 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली आहे. देशातील सोयाबीन दर मागील आठवड्याच्या मध्यापासून सुधारत असताना दिसत आहेत. सोयाबीनचा सरासरी दर 4,900 रुपयांवरून 5,500 रुपयांपर्यंत वाढलेला आहे. आज महाराष्ट्रात सोयाबीनला 5300 ते 5600 रुपयांच्या दरम्यान सरासरी दर चालू आहे. तर लातूर बाजारात सर्वाधिक 5,900 रुपयाने व्यवहार झाले. दुसरीकडे मध्य प्रदेशातील बाजारातील दर हे 5300 ते 5550 रुपयांच्या दरम्यान दिसत होते.

प्रक्रिया प्लांट्सची खरेदी ही वाढल्यानं बाजारतील दर हा सुधारलेला दिसत आहे. दर वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री कमी केल्याचं आपल्याला दिसतं. सध्या बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमी झालेली दिसतेय. तर दुसरीकडे गरज असलेले शेतकरी वाढलेल्या दरात मालाची विक्री देखील करत आहेत. सध्या दर वाढत असल्यानं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी सांगितलं आहे.

Leave a Comment